शिवसेना अंगीकृत भारतीय कामगार संघटनेचे नेतृत्व करणारे माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांचे सोमवारी रात्री ८.३० वाजता मुंबईतील चेंबूर येथील झेन रुग्णालयात अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कामगार क्षेत्रातील भक्कम नेतृत्व शिवसेनेने गमावल्याची भावना सर्व स्थरातून व्यक्त होत आहे.
महाडिक यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी घाटला गाव, चेंबूर येथे आज सकाळी ७ ते १० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील काडवली पाचघर वाडी या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेने कामगारांसाठी अनेक यशस्वी लढे दिले. अनेक कंपन्यांमध्ये या संघटनेने वेतन करार घडवून आणत कामगारांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही या संघटनेचे जाळे पसरवण्यात महाडिक यांचे योगदान राहिले. महाडिक यांच्या निधनाने शिवसेनेने खंदा कामगार नेता गमावला.