मराठवाडा न्यूज

बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन ७५ वर्षीय वृद्धाला लुटले! तीन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

Aditya chandramani Wane
द्वारा Aditya chandramani Wane रोजी October 31, 2026

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसमधून प्रवास करताना अनोळखी सहप्रवाशाशी ओळख वाढवणे एका ७५ वर्षीय वृद्धाला चांगलेच महागात पडले. गप्पांच्या बहाण्याने जवळीक साधत एका भामट्याने वृद्धाला बिस्किटातून गुंगीचे औषध दिले आणि त्यांच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या अंगठ्यांची किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दादाभाऊ भाऊराव वैद्य (वय ७५, रा. एरंडवणे, पुणे) हे जालना येथून पुण्याला जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होते. २३ तारखेला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही बस छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात आली.

यावेळी सुमारे ५५ वर्षांचा एक अनोळखी व्यक्ती वैद्य यांच्या शेजारी येऊन बसला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तीने वैद्य यांना खाण्यासाठी बिस्किट दिले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला; मात्र त्या व्यक्तीच्या आग्रहामुळे त्यांनी बिस्किट खाल्ले.

बिस्किट खाल्ल्यानंतर वृद्ध बेशुद्ध

काही वेळातच वैद्य यांना चक्कर येऊ लागली आणि गुंगी येऊन ते बेशुद्ध झाले. दरम्यान, सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते पिंपरी येथील वल्लभनगर एसटी बसस्थानकावर बेशुद्ध अवस्थेत आढळले.

बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या मोबाईलवरून मुलगा आशीष याच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांना प्रथम वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याच रात्री दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.

शुद्धीवर आल्यानंतर अंगठ्या गायब असल्याचे लक्षात

२५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वैद्य शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांनी आपल्या हाताकडे पाहिले असता सोन्याच्या तीन अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अंगठ्यांचे वजन तीन तोळे असून किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

बसस्थानकात शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीनेच बिस्किटातून गुंगीकारक औषध देऊन सोन्याच्या अंगठ्या चोरल्याचा संशय वैद्य यांनी व्यक्त केला.

या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा : प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीने दिलेले खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारू नका. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी.


बातमी : आदित्य चंद्रमणी वणे
संपादक – महाराष्ट्र बुलेटिन / मराठवाडा न्यूज