मराठवाडा न्यूज

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! इम्तियाज जलील यांना हत्येची धमकी; पत्रात सुपारी देणाऱ्या तरुणाचे नाव आणि पत्ता असल्याचा दावा

Aditya chandramani Wane
द्वारा Aditya chandramani Wane रोजी October 31, 2026


लेखक: आदित्य चंद्रमणी वणे | कार्यकारी संपादक
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना हत्येची धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाला त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर इम्तियाज जलील आपल्या कार्यालयात गेले असता त्यांना हे संशयास्पद पत्र आढळले. विशेष म्हणजे, पत्रामध्ये कथितरित्या संबंधित तरुणाचे नाव आणि पत्तादेखील नमूद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अहिल्यानगरमधील तरुणाला सुपारी दिल्याचा पत्रात उल्लेख
या पत्रातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाला जलील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा करण्यात आलेला दावा. संबंधित तरुणाचे नाव आणि पत्ता पत्रात असल्याचे जलील यांनी सांगितले आहे.