Skip to content Skip to footer

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती

सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांनी मिळून “महाविकास आघाडी” करून सत्ता स्थापन केलेली आहे. ३० डिसेंबरला राजभवनाच्या पटांगणात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे नाही तर विरोधकांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे. जर गृहमंत्री पद राष्ट्रवादीला दिले तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील अशी टीका दोनच दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परंतु जर गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे आपला अडचणी वाढू शकतात अशी भीती पाटील यांच्या बरोबर भाजपा नेत्यांना वाटत आहे.

मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्वाचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्यास आपली मोठी कोंडी होऊ शकते आणि राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऐननिवडणुकीच्या तोंडावर गोवल्या जाण्याचा वचपाही काढला जाऊ शकतो, या भीतीने भाजपच्या नेत्यांची गाळण उडाली असून त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाला वेगळाच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अर्थ खाते, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहखातही शिवसेनेने दिले तर मग यांनी स्वत:कडे ठेवले काय फक्त मुख्यमंत्रिपद?, असा सवाल करतानाच गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेले तर आपली मोठी कोंडी होऊ शकते, ही भाजप नेत्यांची धास्ती चंद्रकांत पाटील लपवू शकले नाही.

काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांना तुरुंगात टाकून दिलेला त्रास आणि शरद पवारांना ईडीच्या जाळ्यात अडकवून कोंडीत पकडण्याचा टाकलेला डाव अशा घटनांचे उट्टे काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली गोची केली जाऊ शकते, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, त्यामुळे गृहमंत्रिपद तरी राष्ट्रवादीला देऊ नका, असा प्रेमळ सल्ला आपण उद्धव ठाकरेंना देतो, असे सांगून चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणाला वेगळाच राजकीय रंग देऊन शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी मातोश्रीवर कॅमेरे बसण्याची काडी टाकल्याचे मानले जात आहे.

Leave a comment

0.0/5