Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद पडला, मुंबईचा सिद्धिविनायक मदतीला धावून आला

राष्ट्रपती राजवटीचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला सध्या टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळं ५ हजार ६५७ रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा टाळे लागल्याने आज हजारो रुग्ण या मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत मिळण्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातून या ठिकाणी येत होते.

मात्र विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून या कक्षाचे काम रेंगाळले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतरही निवडणुकीच्या काळात कक्षाचे काम झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या ५ हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा सिद्धिविनायक या रुग्णांच्या मदतीला धावला असल्याचे चित्र आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांधेकर यांनी यासंदर्भात माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आमची ट्रस्ट राज्यातील गरीब रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंत करणार असल्याचे सांगितले. २५ हजारांपर्यंतच्या मदतीचा चेक संबंधित हॉस्पिटलच्या नावाने दिला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5