Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 6 वर, नागरिकांनो राहा Alert

राज्यातल्या नागरिकांनो सावध व्हा ! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या चिनी कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) संशयित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. नुकतंच चीनहून भारतात परतणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत अशा एकूण 6 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आलेल्या या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला पुण्यातील नायडू रुग्णालयात एका विशेष विभागात दाखल केलं आहे. मुंबई, पुण्यात एकूण 6 जणांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. या 6 जणांपैकी 4 जण मुंबई आणि 2 जण पुण्यातील रुग्णालयात आहेत. आतापर्यंत यापैकी कोणत्याही व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये व्हायरस सापडला नाही.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत चीनहून भारतात येणाऱ्या 3,756, प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार अशा प्रवाशांची यादी तयार करणार आहे, जे चीनहून विशेषत: वुहान क्षेत्रातून 1 जानेवारीनंतर मुंबईत परतलेत. त्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली जाईल.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24X7 हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोरोनाव्हायरसबाबत काहीही माहिती हवी असल्यास या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे.

Leave a comment

0.0/5