Skip to content Skip to footer

“मार्मिक”कार बाळासाहेब ठाकरे “शिवसेना प्रमुख” झाले ! ; उद्धव ठाकरेंनी जागवल्या आठवणी….!

“मार्मिक”कार बाळासाहेब ठाकरे “शिवसेना प्रमुख” झाले ! ; उद्धव ठाकरेंनी जागवल्या आठवणी….!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला आपल्याच महाराष्ट्रात न्याय मिळवून देण्यासाठी ५० वर्षापूर्वी मार्मिक ह्या व्यंगचित्र साप्ताहिकाची सुरुवात केली होती. मात्र त्यातल्या व्यगंचित्रांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला होता. ही आठवण काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

‘बाळासाहेब ठाकरेंना मार्मिककार म्हटलं जाई’, असे म्हणत ते शिवसेनाप्रमुख कसे झाले याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली. मार्मिक या साप्ताहिकाचा हीरक महोत्सव मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मार्मिक व बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

“मार्मिकला खूप चांगला प्रतिसाद त्यावेळी मिळत होता. अनेक लोक घरी यायचे. तेव्हा माझे आजोबा (प्रबोधनकार ठाकरे) यांनी माझ्या वडिलांना (बाळासाहेब ठाकरे) विचारलं, ‘की अरे इतकी माणसं घरी येत आहेत. पक्ष किंवा काही संघटना काढणार की नाही?’ त्यावर बाळासाहेब म्हणाले की, ‘हो विचार आहे’. त्यानंतर आजोबांनी लगेच विचारलं संघटनेचं, पक्षाचं नाव काय ठरवलं आहेस? यावर बाळासाहेब काही बोलणार त्याच्या आतच आजोबा म्हणाले ‘शिवसेना’ हे नाव दे. अशा रितीने मार्मिकमुळे शिवसेनेचा जन्म झाला आणि इतके दिवस मार्मिककार अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख झाले”, अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली.

Leave a comment

0.0/5