Skip to content Skip to footer

157 आलिशान खोल्यांचे राजेशाही ‘हॉटेल हयात प्लेस’ लवकरच औरंगाबादेत; रेस्तरॉ, स्विमिंग पूल, पिकअप फूड अशा सुविधा

  • सन 2023 मध्ये ‘हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट’ सुरू होणार, 5 हजार जणांना मिळणार रोजगार

जगातल्या ५७ देशांत ५०० हॉटेल असणारे “हयात हॉटेल कॉर्पाेरेशन’ औरंगाबादमध्ये पाऊल ठेवणार आहे. डीएमआयसी, ऑरिक सिटी, स्मार्ट सिटीवर नजर ठेवत हा समूह चिकलठाणा परिसरात २०२३ पर्यंत “हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट’ सुरू करणार आहे. १५७ खोल्यांच्या हॉटेलमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. सध्या हयातची महाराष्ट्रात पाच हॉटेल असून औरंगाबादसह ३ प्रस्तावित आहेत. लॉस एंजलिसमध्ये १९५७ मध्ये सुरू झालेल्या “हयात हॉटेल कॉर्पाेरेशन’चे मुख्यालय शिकागोमध्ये आहे. ३० जून २०२० पर्यंत हयात समूहाकडे ५०० हॉटेलच्या १ लाख १ हजार रूम्स आहेत. २०२३ पर्यंत हॉटेलची संख्या ७०० होणार आहे. समूहाचे हयात हाऊस, हयात सेंट्रिक, हयात प्लेस, हयात रिजेन्सी, ग्रँड हयात, पार्क हयात, अंदाज, अलिला असे १० फॉरमॅट आहेत.

औरंगाबादमध्ये संधी :

हयात समूह शहरात “हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट’ नावाने हाॅटेल सुरू करणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाआधीच शहराची पाहणी केली हाेती. येथील क्षमतांचा अभ्यास केला. विद्यमान हॉटेल चालकांशी चर्चा केली. काही उद्योजकांचीही भेट घेतली. शिवाय पर्यटन महत्त्वही “हयात’ने विचारात घेतले. त्यानंतर आॅरिक आणि विमानतळाजवळ हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हयात : राज्यात ५ सुरू, ३ प्रस्तावित :

भारतात महाराष्ट्रासह १६ राज्यांत हयातची ३४ हॉटेल सुरू आहेत, तर १९ प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात समूहाची मुंबई,पुण्यासह ५ हॉटेल्स आहेत. २०२३ पर्यंत हयात प्लेस औरंगाबाद एअरपोर्ट, हयात प्लेस चाकण आणि हयात प्लेस शिरोळी प्रस्तावित आहेत.

रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, पिकअप फूड अशा सुविधा :

२०२३ पर्यंत १५७ आलिशान गेस्टरूम्सचे हॉटेल सुरू होईल. “हयात’चे खास वैशिष्ट्य असणारे डिझाइन, आर्किटेक्चर शहराचे वैभव वाढवतील. या ठिकाणी रेस्टाॅरंट, बार, स्विमिंग पूल, पिकअप फूड अशा सुविधा असतील. यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ५००० रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Leave a comment

0.0/5