Skip to content Skip to footer

हृदयाला छिद्र म्हणून जन्मदात्या बापाने मुलीला लोटले दूर, पण शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाने दिले जीवनदान…

शिवसेना मदत कक्षाच्या कार्यालयात आज एक आई आपल्या लहानशा मुलीला घेऊन पेढयांचा बॉक्स घेऊन कार्यालयात भेटायला आली. तसे कारण सुद्धा खासच होते. जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या समृद्धी सुप्रिया म्हस्कर या लहान मुलीला जन्मदात्या पित्याने आईसकट घराबाहेर काढले होते. परंतु जन्मदाती आई कशी काय आपल्या चिमुकलीला वाऱ्यावर सोडून देऊ शकते, त्यात हृदयाला छिद्र असल्या कारणामुळे डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचे सुचविले होते. परंतु या ऑपरेशनला लाखो रुपयाचा खर्च येणार असल्याचे सुद्धा सांगितले होते. परंतु तो खर्च एकट्या आईला न झेपणारा होता. अनेक ठिकाणी हेलपाट्या मारल्यावर त्या माऊलीला कोणीतरी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची माहिती दिली होती.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या मोफत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया शिबिरात या लहान मुलीला दाखवण्यात आले आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पुढील उपचाराकरिता ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ह्या बाळाला नेण्यात आले होते. पुढे त्या चिमुकलीवर वैद्यकीय कक्षाच्या मदतीने मोफत शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली होती. आपल्या मुलीला मिळालेल्या जीवनदानाचा आनंद त्या माऊलीला गगनात मावेनासा झाला होता.

या संकटातून सावरलेल्या माऊलीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यलयात जाऊन तेथील कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानले. त्यासाठी आभार पत्र आणि मिठाईचा बॉक्स घेऊन त्या माउलीने आपल्या चिमुकलीसह कक्षाला भेट दिली होती. यावर मत व्यक्त करताना कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हे श्रेय मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलेले आहे. तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सदर बाळाची चौकशी केली. तसेच भविष्यात बाळाच्या पालनपोषण आणि शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचा शब्द देत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्हाला आवाज द्या, आम्ही नेहमीच उपलब्ध राहू असे सांगत डॉ श्रीकांत यांनी त्या माऊलीला आश्वासन दिले.

Leave a comment

0.0/5