सोनिया गांधी यांच्या विरोधात टिप्पणी करणाऱ्या गोस्वामी विरोधात FIR दाखल
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध टिप्पणी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल रिपब्लिकन टीव्ही चॅनलचे मुख्य संस्थापक अर्णब गोस्वामी विरुद्ध देशभरात काही ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही नागपूरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मंत्री नितीन राऊत यांच्या तक्रारीवरून भादंविच्या १५३, १५३- अ, १५३-ब, २९५- अ, २९८, ५००, ५०४, ५०५ (२), ५०६, १२०-ब, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांनी कट रचून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनांमध्ये तेढ, द्वेषाची भावना वाढावी तसेच धार्मिक एकोपा टिकण्यास बाधक असे युक्तिवाद केले, असा आरोप गोस्वामी यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच राजस्थानच्या भिलवाडा पोलीस स्थानकात, छत्तीसगड काँग्रेसनेही अर्णब विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव आणि प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी रायपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.