पुन्हा भाजपाला मिळाला घरचा आहेर वाचा कोणी केली टीका….!
कोरोनाच्या वाढत्या संकटाने जगात थैमान घातले आहे. मृत्यू दारात उभा आहे. अशा भयंकर संकटाच्या वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही मंडळी राजभवनाचे उंबरठे झिजवून गलीच्छ राजकारण करीत असून सरकारला अडचणीत आणण्याचे कारस्थान करीत आहेत. याचा मला खूप खेद वाटतो अन् मनस्वी संतापही येतो, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या सूर्यकांता पाटील यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. सूर्यकांता पाटील यांनी दिलेल्या या घरच्या आहेरामुळे भाजपच्या घाणेरड्या राजकारणाची राज्यभरात छिथू: होत आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्याचा कांगावा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच आमदार आशिष शेलार आदींनी राज्यात आणीबाणी लागू करावी, अशी कोल्हेकुई करत राजभवनाच्या खेट्या घातल्या. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर आपल्या भावना मोकळ्या केल्या. आज ‘सामना’ प्रतिनिधीनेही त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या सत्तापिपासू राजकारणावर जोरदार घणाघात केला.