Skip to content Skip to footer

जुनी भाजप आता राणे-भाजप म्हणून नावारूपास, निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांची खंत

जुनी भाजप आता राणे-भाजप म्हणून नावारूपास, निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांची खंत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि काँग्रेसनंतर भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना जुन्या निष्ठवंतांना डावलून आमदार आणि खासदारकीची तिकीट सुद्धा भाजपाच्या वरिष्ठांनी देऊ केली होती. मात्र आज नारायण राणे यांच्या प्रवेशामुळे कोकणातील निष्ठावान भाजपा कार्यकर्ते आणि पदधिकारी कुठेतरी दुखावले गेल्याचे चित्र मागच्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. अशी खंत एका निष्ठावान कोकणातील भाजपा कार्यकर्त्याने बोलून दाखवली आहे.

या संदर्भात सोशल मीडियावर लिखाण करून आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे. आज निष्ठवंतांना डावलून राणे पिता-पुत्रांनी आपल्या मर्जीतल्या लोकांना पदे वाटून कुठेतरी वर्षानुवर्षे भाजपा वाढवण्याचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे.

जुन्या भाजप कार्यकर्त्यांवर आत्मचिंतनाची वेळ

अनेक दिवस यावर लिखाण करावं करावं असे वाटतं होत परंतु भाजप पक्ष संघटनेत गट निर्माण होतील या भीतीने लिखाण करणे टाळले होते. परंतु सध्याची भाजपची परिस्थिती पाहता यावर जुन्या भाजप कार्यकर्त्यांची कानउघडणी करणे गरजेचे आहे. त्यातूनच हा लेख प्रपंच मी करीत आहे. पूर्वीपासूनचा भाजप कार्यकर्ता असल्याने मला सध्याची मूळ भाजपची होत असलेली वाताहात पाहवत नाही यात जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना पदांची खिरापत वाटली जातेय हे जुन्या कार्यकर्त्यांसाठी दुर्दैवी आहे. राणेंबाबत माझ्या मनात द्वेष नाही परंतु जुन्या भाजप कार्यकर्त्याला पक्षात न्याय मिळत नाही याचे शल्य जरुर आहे.

सांगायचा मुद्दा एवढाच की, राणे जेव्हा काँग्रेस मध्ये गेले तेव्हा त्यांनी सिंधुदुर्ग मधील मूळ काँग्रेस नष्ट केली. मूळ काँग्रेस संपवून त्यावेळचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांना बाजूला सारून आपल्या समर्थकांना अध्यक्ष केले. एवढयावरच न थांबता काँग्रेसची सगळी पदे आपल्याच समर्थकांना कशा रीतीने मिळतील त्या दृष्टीने राणेंनी फासे टाकायला सुरवात केली. त्यातही ते यशस्वी झाले. जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार करता केवळ कळसुली मतदार संघात मूळ काँग्रेसची एकच सीट दिली. जिल्हापरिषदेतही मूळ काँग्रेसचे अस्तित्व संपवून टाकले. त्यामुळे सिधुदुर्गात राणे काँग्रेसची वाढ झाली. काँग्रेसच्या मदतीने आपल्या समर्थकांची मोट राणेंनी बांधली. परंतु मुख्यमंत्री पदाची लालसा असल्याने व ते न मिळाल्याने राणेंनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टींवर व पक्षावर बेछूट आरोप केले. काँग्रेसने राणेंना महत्वाची मंत्री पदे देऊनही त्यांचे समाधान केव्हाच झाले नाही. आणि कालांतराने काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले. त्यानंतर राणेंनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष स्थापन केला. परंतु त्यांत जम न बसल्याने स्वाभिमान पक्षाला त्यांनी स्वाभिमानाने मुठ माती दिली. शिवसेनेतून राजकारणाची सुरवात केलेल्या राणेंची वाटचाल काँग्रेस, नंतर स्वाभिमान पक्ष करीत भाजप मध्ये स्थिरावली. मात्र राणेंची बार्गेनिंग पॉवर तेव्हा संपलेली होती. एखाद्या मोठ्या पक्षाच्या साथीने पुन्हा जिल्ह्यात आपली ताकद निर्माण करण्यासाठी त्यांनी भाजपच्या गळी पडायला सुरुवात केली. काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदासाठी गेलेले राणे भाजप मध्ये मात्र केवळ प्रवेशासाठी आटापिटा करत होते. परंतु राणेंच्या मूळ गुणांचा अभ्यास न करता केवळ शिवसेनेला नमविण्यासाठी राणेंना भाजपने पक्षात स्थान दिले खरे मात्र असे करत असताना ज्याप्रमाणे राणेंनी मूळ काँग्रेस संपविली त्याच प्रमाणे भाजप पक्ष सिधुदुर्गातून संपणार याचा विचार भाजपच्या पक्ष श्रेष्ठीनी केला नाही. आणि काँग्रेसप्रमाणेच भाजपनेही आपल्या पायावर दगड मारून घेतला.

राणेंचा भाजपमध्ये प्रवेश होऊन वर्ष २ वर्षाचा कालावधी होत आला असून राणेंनी आपली वाटचाल मूळ मार्गानुसार सुरु केली आहे. काँग्रेस प्रमाणेच सिंधुदुर्गातील मूळ भाजपला संपवून आपली ताकद वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे. राणेंना भाजपमध्ये घेण्यास मूळ भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. पंरतु पक्ष श्रेष्टींच्या निर्णयामुळे हा विरोध मावळला. राणे भाजपमध्ये आल्यानंतर पहिला दणका बसला तो प्रमोद जठार साहेबांना एवढी वर्षे राणेंना टोकाचा विरोध करून देखील राणे पक्षात आल्यांनतर जिल्हाध्यक्ष पद त्यांना गमवावे लागले.त्याजागी राणेंनी आपले जुने समर्थक असलेल्या राजन तेली यांना बढती दिली. सर्मथकांची मोट बांधण्यात अडथळा ठरत असलेल्या जठार साहेबांना राणेंनी अतिशय शिताफिने बाजूला सारले. जरी जठार साहेबांना पक्षात बढती मिळाली असली तरी सिंधुदुर्गातील भाजप पक्षाची सूत्रे राणेंच्या हाती गेली. गेल्या वर्षभरात हळूहळू प्रत्येक तालुक्यात राणेंनी मूळ भाजप संघटनेतील पदाधिकाऱयांना बाजूला सारले. सदा ओगले सारखे कठीण काळात भाजप पक्षसंघटना वाढीसाठी राणेंशी झगडले आज ते भाजपच्या प्रवाहाच्या बाजूला फेकले गेले. भाजप पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांना डावलून राणेंना संधी दिली हि जुन्या कार्यकर्त्यांच्या मुळावर आली आहे. कणकवली विधानसभेत जम बसल्यानंतर भाजपच्या बूथ अध्यक्षांपासूनची पदे राणेंनी आपल्या समर्थकांना मिळवून दिली. पूर्वी भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल, रवींद्र शेट्ये होते. मात्र राणेंनी यांना देखील बाजूला सारून संतोष कानडे यांना त्याजागी नेमले.यामुळे भाजपचे कणकवलीतील जुने कार्येकर्ते आपोआप बाजूला सारले गेले. फोंडा विभागात वोटबँक असणाऱ्या राजन चिके यांना पक्षाकडून तालुकाध्यक्ष पद देण्यात आले. मात्र त्यातही राणे समर्थकांनी कुरघोड्या सुरु केल्याने अंतर्गत राजकारणाला कंटाळून चिके यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.भाजपची मूळ संघटना बाजूला सारून राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले बस्थान मांडायला सुरुवात केली आहे.

काल शहर मंडल अध्यक्ष पदी देखील राणेंसमर्थकच नेमण्यात आला. जठार साहेब जर जिल्हाध्यक्ष असते तर कदाचित जिल्हातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली असती.परंतु राजन तेली जिल्हाध्यक्ष असल्याने राणेंनी जिल्ह्यातील भाजप संघटना आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसचे अस्तित्व संपवले त्याचप्रमाणे भाजप पक्षाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. एवढी वर्षे जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी वाढविलेला पक्ष आज राणेंच्या इशाऱयांवर नाचायला लागला आहे. हे एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला वेदनादायी आहे. उद्या राणेंना आणखी कशाचे आमिष मिळाल्यास अन्य पक्षात त्यांनी प्रवेश केल्यास आताची काँग्रेसची परिस्थिती उद्याची भाजपची ठरू नये. एवढीच सदिच्छा.!

Leave a comment

0.0/5