Skip to content Skip to footer

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे मात्र हे करतांना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडत होते.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली आहे. तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असे सांगण्यात येते की मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून, जुलैमध्येही येऊ शकतो असेही बोलल्या जात आहे. वूहान मध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय, असे मी वाचले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई मध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

Leave a comment

0.0/5