Skip to content Skip to footer

२१ वर्षांची परंपरा:बाळासाहेबांनी ७० हजार महिलांना दिला होता न्याय,महिला आजही बांधतात राखी

बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. काल हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरा झाला. त्यातच काल स्वातंत्र्यदिन सुद्धा होता. त्यामुळे राष्ट्रीय सण आणि धार्मिक सण यांचा अपूर्व संगम सर्वांचाच उत्साह द्विगुणित करणारा ठरला. रक्षाबंधन सणाच्या अनेक प्रथा परंपरा देशभर प्रचलित आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत अशीच एक अनोखी रक्षाबंधनाची परंपरा. ही परंपरा गेल्या २१ वर्षांपासून अखंड सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे ही परंपरा जपत आहेत. सोलापूरच्या विडी कामगार महिला प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मातोश्रीवर येऊन शिवसेनेच्या नेतृत्वास राखी बांधतात. आजच्या या विशेष लेखात जाणून घेऊया या परंपरेबद्दल:

परंपरा

बाळासाहेबांमुळे ७० हजार महिलांना न्याय मिळाला

तो काळ १९९९ चा होता. महाराष्ट्रात तेंव्हा शिवसेनेचं सरकार होतं. याच कालावधीत सोलापुरातील विडी उद्योग आणि यंत्रमाग उद्योग डबघाईला आले. अनेक विडी कारखाने तसेच सूतगिरण्या बंद पडल्या. सोलापुरातील महिलांचा रोजगार यामुळे बंद पडला. तुटपुंज्या पगारावर काम करणं महिलांना परवडत नव्हतं. अनेकांचा रोजगार तर पूर्णपणे थांबला. अशा परिस्थितीत सोलापुरातील हजारो महिलांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी सर्व महिला एकत्र आल्या. राज्यात युती सरकार असल्याने सरकारचा रिमोट कंट्रोल हातात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांकडे न्याय मागायचा असं ठरलं. बाळासाहेब नक्की न्याय देतील अशी आशा ठेऊन तब्बल १० हजार महिला शिवसेना कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वात मुंबईत आल्या. हा मोर्चा मुंबईत दाखल होताच शिवसेनाप्रमुखांनी मोर्चाची दखल घेतली. महिलांच्या समस्या समजून घेत बंद पडलेला विडी आणि यंत्रमाग उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी यशस्वी मध्यस्ती केली. बाळासाहेबांमुळे सोलापुरातील जवळपास ७० हजार महिलांना न्याय मिळाला.

२१ वर्षांपासून मातोश्रीवर रक्षाबंधन

विडी कामगार महिलांनी बाळासाहेबांकडे मागणी करताच बाळासाहेबांनी चुटकीसरशी त्यांच्यावरील अन्याय दूर केला. यामुळे बाळासाहेब आणि शिवसेनेविषयी कृतज्ञतेचा भाव ठेऊन या महिला २१ वर्षांपासून मातोश्रीवर येत रक्षाबंधन साजरं करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा आजही अखंड सुरु आहे. काल रक्षाबंधनानिमित्त या महिलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना राखी बांधत ही परंपरा कायम ठेवली आहे. एवढंच नव्हे तर या महिला मातोश्रीवरील सेवक, संरक्षण देणारे पोलीस आणि इतर प्रमुख शिवसेना नेत्यांनाही राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. एखाद्या राजकीय नेत्याच्या आणि पक्षाच्या इतिहासात अशी रक्षाबंधनाची परंपरा असणं दुर्मिळच म्हणावं लागेल. अशी ही बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरेंची सोलापूरच्या कामगार भगिनींसोबत असलेली रक्षाबंधनाची अतूट परंपरा राजकारणापलीकडील नातं दाखवणारी आहे.

विधानसभेत राष्ट्रवादीचा सुपडासाफ करणार,आढळराव यांच्या उपस्थितीत आदिवासींचा निर्धार

1 Comment

Leave a comment

0.0/5