Skip to content Skip to footer

आलिशान कारमधून मुंबईत गोमांस तस्करी, चिपळूण पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

गोमांसाची तस्करी करणारे ट्रक, टेम्पो, ट्रेलर पकडल्या गेल्याचं आपण ऐकलं असेल. पण आलिशान कारमाधून  गोमांसाची तस्करी केली जातीय हे कुणी सांगितलं तर क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण मुंबई पोलिसांच्या तपासातूनच ही धक्कादायक बाब समोर आलीय. मुंबईत गोमांस आणण्यासाठी तस्कर चक्क आलीशान कारचा वापर करत असल्याचं उघडकीस आल्यानं पोलिस यंत्रणा खडबडून जागी झालीय.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर गोमांसाच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असते. पण तरीही पोलिसांना गुंगारा देत तस्कर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करत असतात. साधारणपणे मोठे ट्रेलर, ट्रक, कंटेनर, टेम्पोतून चोरीछुपे ही तस्करी केली जाते. पोलिसांनी आजवर अनेक गाड्या पकडून जप्तही केल्या आहेत.

त्यामुळेच गोमांस तस्करांनी गोमांस मुंबईत आणण्यासाठी आता आलिशान कारचा वापर सुरु केल्याचं धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून समोर आलंय. चिपळूण पोलिसांनी मोहम्मद शाहिद सुलेमान कुरेशी आणि शहजाद मसूद चौधरी या दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात. दोन्ही आरोपी मुंबईचे आहेत.

दोन्ही आरोपी मुबंईतून कोकणात जात असत. भटकी गुरे दिसली की त्यांना ते पकडायचे आणि हत्या करायचे. त्यानंतर त्या गुरांचं मांस  आलिशान कारमधून मुंबईत आणलं जायचं. आलिशान कारमुळे कधीच कुणी त्यांच्यावर संशय घेतला नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोमांस तस्करी अगदी बिनबोभाट सुरु होती. या दोन्ही आरोपींवर गुजरातसह, दिव, दमण आणि पालघर भागात गोवंश हत्येप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

काही दिवसांपूर्वीच चिपळूणमध्ये गोहत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. या चौकशी दरम्यान पोलिसांचे धागेदोरे मोहमद शाहिद सुलेमान कुरेशी आणि शहजाद मसूद चौधरीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीनं या दोघांच्या मुसक्या आवळल्यात. या दोघांना अटक केल्यामुळे आणि त्यांची मोडस ऑपरेंडी समोर आल्यानं अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5