Skip to content Skip to footer

विरोधकांच्या डोक्यावर दंडुका पडल्याशिवाय डोके ठिकाणावर येणार नाही – सामना

विरोधकांच्या डोक्यावर दंडुका पडल्याशिवाय डोके ठिकाणावर येणार नाही – सामना

सध्या देशात नाही तर संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला आहे. या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अनेक व्यवसायिक, सिने कलाकार, समाज माध्यमे, विविध सामाजिक संघटना सढळ हाताने मदत करताना दिसत आहेत. मात्र राज्याच्या विरोधी पक्षाने अजून कोणतीच मदत मुख्यमंत्री साह्यता निधीला देऊ केली नाही. त्यामुळे अशा विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी टीका सामना या मुखपत्रातून विरोधकांवर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय? कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल.

सरकारने २१ दिवसांचे `लॉक डाऊन’ जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही. चीनने कोरोना आटोक्यात आणला याचे कौतुक सुरू आहे. पण सहा हजारांवर बळी देऊन त्यासाठी त्यांना दंडुक्यांचा नव्हे तर बंदुकांचाही वापर करावा लागला असेल. हिंदुस्थानातही चीनप्रमाणे सहा हजार बळी जाऊ द्यायचे आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे.

पोलिसांना ही भाषा का वापरावी लागते? दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे.

Leave a comment

0.0/5