Skip to content Skip to footer

कोरोनाशी लढण्यासाठी ठाणेकरांनो साथ द्या – महापौर म्हस्के

कोरोनाशी लढण्यासाठी ठाणेकरांनो साथ द्या – महापौर म्हस्के

ठाणेकरांनी आतापर्यंत ठाण्याच्या विकासासाठी साथ दिलेली आहे. तसेच या कोरोनाच्या युद्धामध्ये आम्हाला आपले सहकार्य हवे आहे. पण दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, या युद्धामध्ये ठाणेकर म्हणावे तसे अजूनही सहकार्य करत नाहीत. ठाण्यातील मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट असे कितीतरी भाग आहेत या भागात टाळेबंदीचे नियम नागरीक पाळत नाहीत असेच चित्र दिसून येते. काही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत, कोणत्यातरी शुल्लक कारणास्तव सुशिक्षित नागरिक देखील रस्त्यावर दिसत आहेत. कधी आले, लिंबू आणण्याचे कारण, तर कधी फिरण्याच्या हेतुने मेडिकल मधून फेअर अँड लवली घेवून बाहेर पडतात, यातून दुर्दैवाने टाळेबंदीची शिस्त मोडते आहे. हे सगळं करून काय साध्य होणार आहे बाबांनो? तर आपल्या मरणाला आपणच आमंत्रण देत आहोत. त्यामुळे आता तरी सावध व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

त्यामुळे पालिकेने दिलेले नियम शिस्तीने पाळा, आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे, की घरात राहायचे आहे. या ठाणे शहराचे तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून, या महाराष्ट्राचे तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून आणि या देशाचे तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून फक्त आणि फक्त एकच गोष्ट करा, स्वत:च्या घरी रहा, बाहेर पडू नका आणि आपला जीव वाचवा. ठाण्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी पुन्हा एकदा आपल्याला अत्यंत नम्रपणे हात जोडून विनंती करतो आहे,

की आपल्या मरणाला आपणच हाक मारून बोलवू नका! घराबाहेर पडू नका! आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छता राखा, बाजारपेठांमध्ये गर्दी करू नका, नाक्यानाक्यावर एकत्र जमू नका, तुम्ही फक्त घरी राहा, या युद्धात आम्ही, आमची महापालिकेची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सगळे सैनिकांसारखे काम करत आहोत, तुम्ही फक्त घरी राहून आम्हाला लढ म्हणा! एवढेच हात जोडून पुन्हा पुन्हा तुम्हाला मी सांगतो आहे

Leave a comment

0.0/5