Skip to content Skip to footer

मुंबई आयुक्तांचा दावा – “जुलै पर्यंत कोरोना येईल आटोक्यात”

मुंबई आयुक्तांचा दावा – “जुलै पर्यंत कोरोना येईल आटोक्यात”

मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी कोरोना विषयी माहिती देताना येणाऱ्या जुलै महिन्यात कोरोना आटोक्यात येईल, असा दावा केला आहे. शहरातील कोरोना बाधितांच्या दुपटीचा सरासरी कालावधी ३६ दिवसांवर पोहचला असून, महापालिकेने दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असलेल्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केल्यामुळे कोरोनावर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने टेस्टिंग, ट्रॅकिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट या सूत्रांचा अवलंब केला असून, २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल वैद्यकीय प्रयोगशाळांना देणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालये यांची क्षमता वाढविण्यात आली. मे महिन्यातील ३,७०० खाटांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जून अखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार खाटा उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनी मिशन झिरो या मोहिमेबद्दल स्पष्ट करताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. खाटा वाढविताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पालिकेने पाचपट वाढ केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुंबईत महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागांतून डॉक्टरांना आणण्यात आले असून, मे महिन्यातील १०० च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७०० पर्यंत पोहोचली आहे. वरळी, धारावीप्रमाणे देवनार, गोवंडी, बैंगनवाडी या सर्व आव्हानात्मक भागांमध्ये फिरते दवाखाने व वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक बाधित शोधले आणि संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण केले. यातून कोरोनाची साखळी तोडण्यात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5