Skip to content Skip to footer

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे महापौरांच्या हस्ते प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे महापौरांच्या हस्ते प्रकाशन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय मानव उत्थानासाठी कार्य केले असून त्यांच्या या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी, दादर येथे आज दि. ०५ डिसेंबर २०२० रोजी पार पडले, त्यावेळी अनुयायांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी आमदार श्रीमती यामिनी जाधव, उप महापौर अँड.सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती प्रवीणा मोरजकर, नगरसेवक श्री. अमेय घोले, उपायुक्त (परिमंडळ -२) विजय बालमवार, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे तसेच अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य अखिल विश्वाच्या कल्याणासाठी होते. कोरोना-१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अनुयायांनी जास्त गर्दी करू नये असे आवाहन केले होते, त्या आवाहनाला अनुयायांनी प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी केली नाही, हे विशेष. त्यासोबतच आज या ठिकाणी ज्या आम्ही महिला उपस्थित आहोत त्या केवळ बाबासाहेबांने दिलेल्या संधीमुळे आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे महिलांना सर्व क्षेत्रात संधी प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आज या ठिकाणी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली ही माहिती पुस्तिका नसून एक ग्रंथच असल्याचे महापौरांनी सांगितले. चैत्यभूमी येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याबद्दल महापालिका आयुक्त व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानत असल्याचे महापौरांनी सांगितले.
आमदार यामिनी जाधव यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेला तरतुदीमुळे आम्हा सर्व महिलांना संधी प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेतर्फे अनुयायांना आवाहन करण्यात आले होते, ते आवाहन अनुयायांनी तंतोतंत पाळून आज या ठिकाणी गर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने केलेल्या सोयीसुविधाबद्दल त्यांनी महापालिकेला धन्यवाद दिले. प्रारंभी महापौर व मान्यवरांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर महापौरांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त (परिमंडळ -२) श्री. विजय बालमवार यांनी केले.

Leave a comment

0.0/5