Skip to content Skip to footer

नवीन वर्षात ठाकरे सरकार मुंबईकरांना देणार मोठं गिफ्ट

ठाकरे सरकारच्या मंत्र्याने दिले संकेत

करोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना ठाकरे सरकार नवीन वर्षात मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधी भाष्य केलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महत्वाची माहिती दिली.

“आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असं मला वाटतं,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “एकूण घटती रुग्णसंख्या, रुग्ण बरं होण्याचं प्रमाण तसंच करोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झालं की ट्रेनला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल”.

लोकलमधील गर्दीवर नियंत्रण कसं ठेवणार यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “करोना सध्या नियंत्रणात आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे करोना रुग्ण अचानक वाढले आहेत. तशीच परिस्थिती मुंबईत उद्भवू नये यासाठी पुढचे १५ दिवस नियोजन आणि चर्चा केली जाणार आहे. मास्क न घालता कोणी ट्रेनमध्ये चढू नये, गर्दी कमी करण्यासाठी नियोजन, पोलीस तसंच इतर मनुष्यबळाची मदत या सगळ्या गोष्टींची चाचपणी पूर्ण झाली आहे. तयारी पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात पहिल्या तारखेपपासून लोकल सुरु करण्यासंबंधी विचाराधीन आहे”.

Leave a comment

0.0/5