Skip to content Skip to footer

हिंदू युवकाने महिनाभर पाळला ‘रमजान’, ‘रोजामुळे शरीरात सकारात्मक बदलाचं सांगितल महत्त्व’

रमजानच्या  पवित्र महिन्याची आज सांगता होत आहे. मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे बुधवारी देशभरात ईद साजरी होत आहे. गेल्या महिनाभरापासून रमजान  रोजा धरत मुस्लीम बांधवांनी ईदचा पवित्र महिना उपवास केला. मात्र, केवळ मुस्लीमच नाही तर हिंदू बांधवही तब्बल महिनाभर रमजानचा रोजा करतात, बार्शी तालुक्यातील पाथरीच्या एका तरुणाने दाखवून दिले आहे. अमोल कुदळे असे या तरुणाचे नाव असून मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाचे कटाक्षाने पालन करत अमोल यांनी आपला महिनाभराचा रोजा पूर्ण केला आहे.

शालेय शिक्षणापासूनच मला मुस्लीम मित्रांचा, मुस्लीम कुटुंबीयांचा सहवास लाभला आहे. त्यामुळे आपली दिवाळी साजरी करणाऱ्या मुस्लीमांचा रोजा आपण का साजरा करू नये, असा प्रश्न मला पडला होता. त्यामुळे मी महिनाभर मुस्लीम धर्माच्या रितीरिवाजाचे पालन करुन रोजा केला. तसेच रोजामुळे आपल्या शारिरीक प्रकृतीतही सकारात्मक बदल होतात. रमजानचे रोजे हे कर्करोगावर चांगले औषध असल्याचेही माझ्या वाचनात आले होते. आपल्या शरीरातील सर्वच प्रकारच्या व्हायरला रिसायकलींग करण्याचं कामही रोजा उपवासामुळे होते. शरीरात अमुलाग्र असे सकारात्मक बदल या उपवासामुळे घडतात, असेही अमोल यांनी सांगतिले. अमोल हे बारामती  येथे एलएलबीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून प्रॅक्टीसिंग वकिलीही करत आहेत.

आपल्याला दोनवेळचे जेवण सहज उपलब्ध होते. मात्र, ज्यांना दोनवेळचे जेवणही मिळत नाही, अशा भुकेलेल्यांची अवस्था न जेवल्यामुळे काय होते, हेही रोजाच्या उपवासातून शिकायला मिळते. त्यामुळे रोजा उपवास केल्यानंतर भुकेलेल्यांसाठी अन्न देण्याचं कामही आपण करणार असल्याचे अमोल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मुस्लीम व्यापाऱ्यांशी अमोल यांचे स्नेहबंध जुळले. त्यातूनच, मुस्लीम मित्र आणि व्यापाऱ्यांकडून रोजाच्या पवित्र उपवासाचे धडे घेऊन पालन केले. त्यानुसार, दररोज पहाटे साडे तीन वाजता उठून रोजापूर्वीचा आहार अमोल घेत असत. त्यानंतर दिवसभर कुठलेही अन्न किंवा पाणी न घेता थेट सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतरच रोजा सोडण्यात येई. मुस्लीम धर्माचे पावित्र जपत अमोल यांनी रमजानाच्या संपूर्ण महिनाभर हा रोजा उपवास धरला होता. मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावरच रोजाची सांगता झाली. उद्या मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन शिर कुरमा खाऊन ईद साजरी करणार असल्याचे अमोल यांनी म्हटले.

Leave a comment

0.0/5