Skip to content Skip to footer

पंचविशीच्या आतील विद्यार्थीच निवडणुकीस पात्र

पुणे : महाविद्यालय व विद्यापीठामध्ये खुला पध्दतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये केवळ २५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थीचनिवडणुकीसाठी पात्र असतील. त्यातही मान्यताप्राप्त,नियमित आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच निवडणूकलढवता येईल. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असतील. त्यामुळे शिक्षणाची आवड असणारे गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकतील, असे निवडणुकीच्या नियमावलीवरून स्पष्ट होत आहे.

महाविद्यालयांमधील खुल्या निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली असून विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य व पोलीस प्रशासनाबरोबर निवडणुकांबाबत चर्चा केली आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्राधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर निवडणूक काळात महाविद्यालयाच्या आवारात आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार करता येणार नाही. तर विद्यार्थी उमेदवाराला निवडणूक प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या आवारात शांतता व सलोखा राखण्यासाठी स्वयंप्रेरणेने मदत करावी लागेल.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यापासून सात शैक्षणिक वर्ष पूर्ण केलेले असतील. तसेच कोणत्याही विद्यापीठ परीक्षेतील गैरप्रकारामध्ये गुंतल्यामुळे किंवा कोणतीही गैरवर्तन केल्यामुळे सक्षम अधिकाऱ्याने विद्यार्थ्याला शिक्षा केली असल्यास संबंधित विद्यार्थी निवडणूक लढवू शकणार नाही. नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरवलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र असेल .
त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या व गुणवंत विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढवता येईल.विद्यार्थी निवडणुकांसाठी काही विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढता येणार नाही. तसेच निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही शैक्षणिक वर्षातील ३० सप्टेबर रोजीपर्यंत पंचवीस वर्ष एवढीच असावी. राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधींकडे निवडणुकीचा अर्ज सादर करताना सक्षम अधिकाऱ्या ने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयामध्ये शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात, या उद्देशाने सर्व बाजूंचा विचार करून महाविद्यालयीन निवडणुकांची नियमावली तयार केली आहे. विद्यार्थी निवडणुकांमुळे यापूर्वी महाविद्यालयात खून, मारामाऱ्या अशा घटना घडल्या होत्या. परिणामी प्राचार्य व संस्थाचालकांनी निवडणुकांंना विरोध केला होता. त्यामुळे यंदा या निवडणुकांबाबत काळजी घेतली जात आहे.पंचवीस पेक्षा जास्त वर्षे वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढवता येऊ नये. तसेच केवळ निवडणुकांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटकाव बसावा, याचा विचार करून निवडणुकांबाबतची नियमावली तयार केली आहे.- डॉ.ए.पी.कुलकर्णी,प्रांतप्रमुख,विद्यापीठ विकास मंच,

Leave a comment

0.0/5