खासदार संजय राऊत यांनी दिला जागतिक आरोग्य संघटनेला इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडन हॉम यांनीही ‘लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढेल,’ अशी ‘भविष्यवाणी’ वर्तवली होती. मुळात दीड-दोन महिन्यांच्या अनुभवानंतर कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव याबाबत जगभरातीलच जनता पुरेशी ‘सज्ञान’ झाली आहे. त्यामुळे लॉक डाऊन शिथिल झाल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढेल हे सांगण्यासाठी ज्योतिषी किंवा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कशाला हवेत? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
लॉकडाऊन उघडल्यावर कोरोना वाढेल, असे भाकित करून आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी काय विशेष सांगितले? सामान्य माणसालाही आता या धोक्याची जाणीव झाली आहे. तेव्हा त्यांच्या भीतीत भर घालण्याऐवजी ती दूर कशी करता येईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर आरोग्यावर भाष्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना ह्या कोरोनाच्या काळात विविध आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. तसेच वेगवेगळे अहवाल सादर करून अनेक इशारे देखील देत आहेत. या आकड्यांमुळे सामान्य माणसावर परिणाम होऊन तो घाबरून जातो आहे. तज्ञन्यांनी अहवाल देणे आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे आता थांबवा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.