Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारचा निर्णय, आता कोरोना चाचणी होणार फक्त २२०० रुपयात !

ठाकरे सरकारचा निर्णय, आता कोरोना चाचणी होणार फक्त २२०० रुपयात !

कोरोना साथीशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. त्यामुळे यापुढे खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी साडेचार हजारांऐवजी आता फक्त २,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड चाचणीच्या सुधारीत दरांची यादी जाहीर केली. कोविड चाचणीचे नवे दर हे देशात सर्वात कमी आहेत, असा दावा यावेळी टोपेंनी केला आहे. नव्या निर्णयानुसार, खासगी लॅबना रुग्णालयांतून घेतलेल्या स्वॅब नमुन्यांसाठी केवळ २२०० रुपये आकारता येणार आहेत. तर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅबचे नमुने घेतल्यास त्यासाठी २,८०० रुपये आकारता येतील. पूर्वी हेच दर अनुक्रमे ४,५०० व ५,२०० असे होते. खासगी लॅबसाठी हे नवे दर बंधनकारक असणार आहेत.

जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील खासगी लॅबशी संपर्क साधून यात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करू शकतात. मात्र, सरकारने ठरविलेल्या दरांपेक्षा एक पैसाही अधिक आकारता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. सध्या राज्यात कोविडची चाचणी करणाऱ्या ९१ लॅब आहेत. आणखी पाच ते सहा लॅब लवकरच कार्यरत होतील. नव्या दरांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a comment

0.0/5