Skip to content Skip to footer

करोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिकस्थिती गंभीर – मुख्यमंत्री

शासनाकडून शक्य तेवढी मदत वाटप सुरु, केंद्राला केली मदतीची मागणी

करोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिकस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण वाढत होते. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने टास्कफोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे काही गोष्टींची कमतरता होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे व्हेंटिलेटरची मागणी खूपच होती. त्यानुसार मागणी केल्याप्रमाणे केंद्राकडून व्हेंटिलेटर्स आले आहेत.”

आपल्याला आता करोनासोबत जगायला हवं : उद्धव ठाकरे

सुरुवातीच्या काळात मुंबई आणि पुण्यातच करोनाचे रुग्ण आढळत होते. आता राज्यातील अनेक भागात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. राज्यातील करोनाच्या संसर्गाची पहिली लाट संपलेली नसून आणखी किती लाट येईल याबाबत माहिती नाही. मात्र, आता आपल्याला करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींसमोर मांडली.

“पुण्यावर स्वत: अजितदादाचं लक्ष”

करोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय पाहिजे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादाचं पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी नमूद केलं.

Leave a comment

0.0/5