Skip to content Skip to footer

सामनातून नेपाळच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानाचा समाचार, वाचा…..!

सामनातून नेपाळच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानाचा समाचार, वाचा…..!

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी प्रभू श्रीराम हे नेपाळी असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “सामना”च्या अग्रलेखातून सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला.

वाचा काय लिहिले आहे सामनाच्या अग्रलेखात….

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा (KP Sharma Oli) ओली हे चीनचे कळसूत्री बाहुले आहे. चीनच्या इशाऱ्यावर हे ओली महाशय रोज हिंदुस्थानविरोधी भूमिका घेत आहेत. ओली यांनी आधी नकाशाचा वाद निर्माण केला व आता तर त्यांनी थेट प्रभू श्रीरामांनाच नेपाळ – हिंदुस्थान झगड्यात ओढले आहे. ओली यांनी असे जाहीर केले की, हिंदुस्थानने नेपाळवर सांस्कृतिक अतिक्रमण केले. हिंदुस्थानातील अयोध्या बनावट आहे. खरी अयोध्या नेपाळमध्येच (Nepal) आहे. प्रभू श्रीराम हिंदुस्थानी नव्हते तर नेपाळी होते. ओली यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते हास्यास्पद आहेत.

गेल्या काही दिवसांपासून श्रीमान ओली हे हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकीत आहेत व त्यांचे बोलवते धनी चीनमधील लाल माकडे आहेत. त्यामुळेच त्यांच्या माकडचेष्टा वाढल्या आहेत. हिंदुस्थानविरोधी भूमिकेमुळे ओली यांच्याविरुद्ध पक्षात व संसदेत बंड झाले. त्यांची खुर्ची धोक्यात आली तेव्हा नेपाळमधील चिनी राजदूत ओली यांची खुर्ची वाचवण्यासाठी धावाधाव करताना दिसत होते. म्हणजे ओली हे चीनचे गुलाम बनले असून, संपूर्ण नेपाळ व तेथील हिंदू संस्कृती चीनच्या दावणीला बांधण्याचे त्यांनी ठरवले आहे. आज प्रभू श्रीराम नेपाळात असते तर जसे रावणास ठार केले व पाप नष्ट केले, तसेच त्यांनी हिंदूद्रोही ओलींच्या बाबतीत केले असते.

ओली यांनी रामायण (Ramayan) काळातील जे स्वयंभू खोदकाम केले आहे, त्या खड्डय़ात ते स्वतःच पडतील व नेपाळची जनता त्यावर माती टाकेल. हिंदुस्थानातील अयोध्या ही एक दंतकथा आहे, प्रभू श्रीराम हे नेपाळचे आहेत याचे पुरावे देण्यासाठी ओली यांना इतका वेळ का लागला?

किमान ७०-७५ वर्षांपासून अयोध्येतील रामजन्मभूमीचा लढा सुरू आहे व या लढ्यात शेकडो कारसेवकांनी, साधूसंतांनी आपले बलिदान दिले आहे. ओली हे वेळीच पुढे आले असते, तर हा रक्तपात व त्यानंतरची हिंसा तरी थांबली असती. ओली हे इतिहास व पुराणकाळाचे इतके महान भाष्यकार आहेत हे माहीत असते, तर आपल्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात ओली यांना साक्षीपुराव्यास बोलावता आले असते.

खरे तर बाबराकडूनही या प्रश्नी मोठीच चूक झाली आहे. बाबराला त्याच्या सहकाऱ्यांनी चुकीचा रस्ता व नकाशा दाखवला. बाबरास हिंदूंचे प्राणप्रिय राममंदिर तोडून तेथे मशीद उभी करायचीच होती. म्हणूनच त्याने अयोध्येवर स्वारी केली. आता ओली यांनी बाबरासही मूर्खात काढले. अयोध्या नेपाळात होती व ओलींच्या पूर्वजांनी बाबरास चकवून उत्तर हिंदुस्थानात वळवले. ओली यांनी बाबरास टोपी लावली.

हा एक प्रकारे इस्लामचा अपमान असून ओलींचा ज्युनियर बाप पाकिस्तान यावर ओलींना इस्लामी कायद्यानुसार शिक्षा करणार आहे काय? सत्य पुराव्यांसह असे आहे की, प्रभू श्रीरामांच्या धर्मपत्नी सीतामाईंचे माहेर नेपाळच्या जनकपूरचे. जनकपूर हे नेपाळमधील एक तीर्थस्थान आहे. प्राचीन मिथिला नगरी म्हणतात ती हीच. जनक राजा हा तत्त्वज्ञानी, तपस्वीच होता. सीता ही जनकाची कन्या. सीता लग्नाच्या वयाची झाली तेव्हा जनक राजाने सीतेचे स्वयंवर जाहीर केले.

या स्वयंवराचा ‘पण’ असा होता की, प्रचंड वजनदार असे शिवधनुष्य व दोन बाण ठेवले होते. जो कुणी शिवधनुष्य उचलेल, वाकवील आणि धनुष्याला बाण लावील, सीता त्याचीच पत्नी होईल. रावणापासून भले भले राजे धनुष्याला बाण लावताना उताणे पडले. प्रभू श्रीरामांनी स्वयंवराचा ‘पण’ जिंकला. जनकाने सीतेचा विवाह प्रभू श्रीरामांशी करण्याची घोषणा केली. तेव्हा विश्वामित्र जनकास म्हणाले की, ‘‘तुझे सर्वात जलद जाणारे दूत अयोध्येला पाठव. दशरथ राजा आणि त्याच्या परिवारास ही आनंदवार्ता कळव व त्यांना राम-सीता यांच्या विवाहासाठी येण्याचे निमंत्रण पाठव.’’

दशरथ राजा अयोध्येतून मिथिला नगरीस पोहोचले व प्रभू श्रीराम-सीतेचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यानंतर जनकपुरीची राजकन्या ही अयोध्या नगरीची राणी म्हणून वाजत गाजत आली. नेपाळ आणि हिंदुस्थानचे हे असे धार्मिक व सांस्कृतिक संबंध आहेत. ओली यांचे नातेसंबंध चिनी ड्रॅगन व बाबराशी जुळल्यामुळे त्यांना याचा विसर पडलेला दिसतोय. अयोध्येच्या तीरावर शरयू नदी वाहत आहे, असे पुराणात वर्णन आहे. नेपाळात कोठेही शरयू नदी वाहत नाही. तीच शरयू नदी राममंदिराच्या लढ्यात कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली, पण चिनी लाल माकडांचे गुलाम झालेल्या ओली महाशयांना त्याचे काय? आज त्यांनी अयोध्या व प्रभू श्रीराम नेपाळी असल्याचा दावा केला, उद्या बाबरही नेपाळीच असल्याची टोपी घालतील. प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचेच होते, पण रामजन्मभूमी अयोध्या मात्र हिंदुस्थानचीच. त्याविषयी वाद असण्याचे कारण नाही, असा संपूर्ण संदर्भ राऊत यांनी लेखातून दिला आहे.

Leave a comment

0.0/5