केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंबंधीचा एक किस्सा एका कार्यक्रदरम्यान सर्वांशी शेअर केला. बाळासाहेब ठाकरे आपल्याला नितीन ‘रोडकरी’ असे म्हणत असंत, असे त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले. एका कार्यक्रमात त्यांना रस्ते उभारण्यासाठी एवढा उत्साह कुठून आणता असा सवाल करण्यात आला होता. आपण कोणतेही इंजिनिअर नाही किंवा सिव्हिल इंजिनिअरींगही केलेले नाही, असेही त्यांनी प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ते उभारणीत गडकरी यांना अधिक रस निर्माण झाला. उत्तम रस्त्यांची उभारणी ही माझी आवड आहे. यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला ‘रोडकरी’ म्हणत होते, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. १९९५ ते १९९९ या कालावधीत गडकरी यांच्या खांद्यावर पीडब्ल्यूडी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ची निर्मिती केली होती. या एक्स्प्रेस वे ची निर्मिती विक्रमी २ वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रालय का दिले असा सवाल करण्यात आला. याला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, “ मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते मंत्रालय हवे आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी त्यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याची त्यांना विनंती केली. यापूर्वीही या खात्याच्या जबाबदारी माझ्या खांद्यावर होती आणि याच कामातून मला आनंद मिळतो,” असेही ते म्हणाले.