सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. विधान परिषदेतील मराठी भाषेवरील चर्चेत बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ‘आधी मंत्र्यांनी कामकाजात मराठीचा वापर करावा. राज्यकर्ते म्हणून इंग्रजीचा माज असेल तर लोकांनी तरी मराठीचा आग्रह का स्वीकारावा अस विधान केले आहे.
दिवाकर रावते यांनी पुढे बोलताना ‘मंत्री आपल्या नावाची पाटी लिहिताना ‘कॅबिनेट’ असा शब्द लिहितात. मंत्री आणि राज्यमंत्री असे असताना मला कळत नाही ते ‘कॅबिनेट’ का लिहितात? मंत्रीच ‘कॅबिनेट’ हा शब्द नेहमी वापरतात. तसेच लाल दिव्याची गाडी गेल्यानंतर मंत्र्यांनी गाडीवर ‘एम’ लिहायला सुरुवात केली. त्याऐवजी ‘मंत्री’ असे लिहावे, असे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले, मात्र तेही अजून झाले नाही असे निदर्शनास आणून देत रावते यांनी सर्व मंत्र्यांना कामकाजात मराठीचा वापर करण्याचे आवाहन केले. राज्यकर्ते म्हणून आपणच या सवयी मोडणार नसू तर ते खालपर्यंत कसे झिरपणार? आपल्यालाच इंग्रजीचा माज असेल तर लोकांनी तरी मराठीचा आग्रह का स्वीकारावा, असा सवाल रावते यांनी केला.
दरम्यान, विधान परिषदेत आपण मराठी भाषेवर चर्चा करीत असताना सदस्य मराठीऐवजी इंग्रजीत स्वाक्षरी करतात याकडे परिवहन मंत्री यांनी लक्ष वेधले. १७ जून रोजीच्या हजेरीनुसार ५२ पैकी १९ आमदारांनी मराठी भाषेत स्वाक्षऱ्या केल्या, तर ३३ आमदारांनी इंग्रजी भाषेत स्वाक्षरी केली आहे. शिवसेनेच्या १२ पैकी सहा सदस्यांनी इंग्रजीत स्वाक्षरी केली. इतर देशांचे अध्यक्ष आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्या स्थानिक भाषेत स्वाक्षरी करतात, मग आपण का नाही करीत, असा सवाल रावते यांनी उपस्थित केला.