Skip to content Skip to footer

विलास लांडे, बनसोडे विधान सभेसाठी राष्ट्रवादीकडून अनुत्सुक…..

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आक्‍टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादीने आतपासूनच सुरू केली आहे. होणाऱ्या विधानसभेसाठी बंडखोरी टाळता यावी, तसेच उमेदवाराला अधिकचा वेळ मिळावा, यासाठी पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले होते.

27 जून ते 1 जुलै या कालावधीत पक्षाच्या स्थानिक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड शहरात तीन मतदारसंघ असून या तीन मतदारसंघातील 13 इच्छुकांनी विहित मुदतीत पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीच्याच दोन्ही माजी आमदारांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केलेला नाही. माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे यांनी अर्ज सादर न केल्यामुळे ते राष्ट्रवादीकडून इच्छुक नसल्याचीच बाब समोर आली आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे जाहीर केल्यामुळे या दोघांना अनुक्रमे भोसरी व पिंपरीतून उमेदवारी मिळणार का? याबाबत चर्चा रंगली होती. त्यातच आता या दोघांनीही पक्षाकडे अर्ज सादर न केल्यामुळे आपली दावेदारी मागे घेतली की काय? अशी चर्चा रंगली आहे.

Leave a comment

0.0/5