Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे करणार पुरग्रस्थ भागाचा दौरा….

युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी पूरग्रस्त सांगली, सातारा व कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी आदित्य पूरग्रस्त भागातील गावांना भेट देणार आहेत. कोल्हापूर व सांगलीमध्ये महापुराने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. राज्य सरकारकडून जवळपास ६८०० कोटींच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तर अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष पूरग्रस्तांना मदतीला धावून आले आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेसाठी जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नसून आमचे सर्व लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे असल्याचे सांगितले होते.

या भागामध्ये पूर ओसरला तरी साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहचवणे गरजेचे असल्याने आम्ही त्याला अधिक महत्व देणार आहोत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील पूर बाधित हरिपूर येथे भेट देतील. त्यानंतर ते सांगलीत व्यापाऱ्यांशी संवाद साधुन ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

शिवसेना भवन तथा शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांच्या कडून पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्थ भागाला मोठ्या प्रमाणात मदत जात आहे. मंत्री एकनाथ शिंदे हे पूरस्थितीत कोल्हापूर, सांगली भागात तळ ठोकून होते. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत केंद्रातर्फे १०० डॉक्टरची टीम पुरग्रस्थ भागात पाठवली होती. तसेच खासदार राहुल शेवाळे यांनी पुरग्रस्थ भागातील एक गाव प्रत्येक खासदारने दत्तक घ्यावे अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे कळवली होती.

Leave a comment

0.0/5