देशातील १८ ते २१ या तरुण वयोगटातील मतदारांना नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची भुरळ पडली. त्यांच्यासमोर असे काही मुद्दे मांडण्यात आले की, हा वर्ग भाजपकडे स्विंग झाला. मात्र, काँग्रेसने या वर्गाकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
खाजगी वृत वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाचे सविस्तरपणे विवेचन करताना या परिस्थितीमधून पक्षाला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, यावरही सविस्तर भाष्य केले. हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, देशाच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कोणताही पक्ष पुन्हा सत्तेत आला तेव्हा त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या आहेत. ही गोष्ट खूपच धक्कादायक म्हणावी लागेल. त्यामुळे आता या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी राज्यातील विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. तसेच आगामी निवडणुकीसाठी एकत्र येताना संख्याबळापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला प्राधान्य द्यावे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.