Skip to content Skip to footer

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्ष बदलाच्या गतीला वेग

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याच्या हातात बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे . आमदार पी.एन. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, अर्चना पाटील यांच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. २०१४ मध्ये युती सरकार अस्तित्वात आल्यावर बँकेवरील प्रशासक राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर बँकेवर संचालक मंडळ अस्तित्वात आले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यच्या नेत्यांनी काही जागा वगळता संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध केली. बँकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य मोठ्या प्रमाणात असल्याने अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ यांची निवड झाली. गेली साडेचार वर्षे आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेचा उत्तम कारभार करत बँक नफ्यात आणली आहे..

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी होऊन शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांची निवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेची सात हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. मंत्रीपद आणि बँकेचा कारभार सांभाळताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बँकेवर नवीन अध्यक्षांची निवड होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असले तरी त्यांच्याकडे अध्यक्षपदासाठी सक्षम संचालक नसल्याचे चित्र दिसून येते. मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक संचालक भैय्या माने यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5