Skip to content Skip to footer

शिवसेनेकडून पार्थ पवारांना सल्ला !

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व असं शिवसेनेने म्हटलं आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल असा सल्लाही शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे.

“पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. “शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

 

“सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना?,” अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे.

“शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातील वादळही नाही, पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. चोवीस तास ‘सबसे तेज’ स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त पार्थ यांचे आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे एक पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. शिवाय काही सिनेनिर्मात्यांचीही चौकशी करावी असेही त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले. आताच त्यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ास शुभेच्छा देणारे पत्र पाठवून रामनामाचा जप केला. यावर निर्माण झालेले वादळ शांत झाल्यावर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘माझ्या नातवाच्या बोलण्यास किंमत देऊ नका, तो अपरिपक्व आहे!’’ आजोबांनी नातवास मार्गदर्शन करण्याचे त्यांचे राजकीय कर्तव्य पार पाडले व ‘‘उगाच भलत्यासलत्या गोष्टीत लुडबुड करू नका’’ असा स्पष्ट संदेश दिला आहे,” असं शिवसेनेचं म्हणणं आहे.

 

Leave a comment

0.0/5