Skip to content Skip to footer

काँग्रेस-राष्ट्रवादी विलीनीकरणाचा निर्णय परस्पर घेता येणार नाही-छत्रपती उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली. या चर्चेचे वृत्त जेव्हा बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची चर्चा पिकली होती. या चर्चेबाबत जेव्हा खासदार उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी विलीनीकरणाबाबतचा निर्णय परस्पर घेता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे.

 

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उदयनराजे भोसले नगर जिल्ह्यातील चौंडी इथे आले होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणा संदर्भात चालू असलेल्या चर्चेबाबत विचारले. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की ‘विलीनीकरण करायचं झाले तर ‘कोणाबरोबर’ करायचे आणि ‘का’ करायचे याबाबत चर्चाविनिमय होणं गरजेचे आहे. मला याबाबत काही माहिती नाही, आणि आमच्याशी याबाबत चर्चाही झालेली नाही. याबाबतचा जो निर्णय असेल तो चर्चा करूनच घेतला जाईल, परस्पर निर्णय घेता येणार नाही असेही ते म्हणाले.

गुरुवारी राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पत्रकारांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले होते.या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झाले त्याची तपशीलवार माहिती घेतली.’ याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची आपणास ऑफर आहे का, असे विचारले असता काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाची कमतरता भासत असावी, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले

Leave a comment

0.0/5