Skip to content Skip to footer

“ठाकरे सरकारसाठी करोना हाच मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगनाचा मुद्दा पुढे आणला”

भाजपाचं नाव न घेता साधला निशाणा

“ठाकरे सरकारसाठी करोना हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. काही लोकांनी निव्वळ बदनामीसाठी कंगना आणि सुशांतचा मुद्दा पुढे आणला” अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. “सरकारसाठी करोना हाच मुख्य प्रश्न आणि मुद्दा आहे. करोनाचा सामना कसा करायचा यासाठी ठाकरे सरकार प्रय़त्न करतं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. शिवभोजन दिलं जातं आहे. मात्र काहींना हे पाहवत नाही. त्यामुळेच कंगनाच्या मुद्द्याचं पिल्लू सोडण्यात आलं आहे. हा ठाकरे सरकारला विनाकारण बदनाम करण्याचा प्रय़त्न आहे. करोनावर उपाय योजना सुरु असताना कंगनाचा मुद्दा कुणी पुढे आणला ते शोधा. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मुंबईला बदनाम करण्याचा हा डाव आहे” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आम्हाला ना कंगनाशी घेणंदेणं आहे, ना सुशांतशी. कंगनाचा मुद्दा कुणीतरी मुद्दाम समोर आणला. दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कधी सीआयडी, सीबीआय चौकशी झाली नाही. शेतकरी आत्महत्येबाबत भाजपाने कधीही प्रश्न विचारला नाही. सुशांत सिंह राजपूत, कंगना हे हिरो हिरोईन आहेत म्हणून भाजपाला महत्त्वाचे वाटले का? शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न विचारले असते तर मी भाजपाला सलाम केला असता असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. खास करुन शिवसेना आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. याच मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला गेला असता जाणीवपूर्वक कुणीतरी कंगनाचा मुद्दा पुढे आणला असा आरोप भाजपाचं नाव न घेता केला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांबाबत कुणी आक्षेपार्ह बोललं तर आम्ही काय गप्प बसायचं का? सैनिकांबाबत आक्षेपार्ह बोललं जातं त्यावर कुणी काहीही बोलत नाही. आम्ही काय सगळं सहन करण्यासाठी जन्माला आलो आहे का? असेही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारले आहेत.

Leave a comment

0.0/5