आता तरी बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या भानगडीत राणा दांपत्य झालं ट्रोल?
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ तसेच आपल्या मंत्रालयातील दालनातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कारभारावर लक्ष ठेऊन आहेत. हाच मुद्धा पकडत आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी एसटी बसने प्रवास करून मुख्यमंत्र्यांनी आता तरी बाहेर पडावे, असा टोला लगावला होता.
मात्र राणा दांपत्यांनी मुख्यमंत्र्यावर केलेली टीका सर्व सामान्य जनतेला पचनी न पडल्यामुळे सोशल मीडियावर राणा दांपत्याला ट्रोल करण्यात आले आहे. यावर एका नेटकऱ्याने तर राणा दांपत्याला शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. ‘अहो ताई, तुम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना बाहेर पडा, हा सल्ला कसा काय देऊ शकता,आपण काय मातोश्री वर शिपाई म्हणून काम करता की काय?, असा टोला या नेटकऱ्याने हाणला आहे. तर काहींनी हाथसार प्रकरणावरून टीका केली आहे. ‘हो पण जेवढी खासदार मॅडमनी कंगना बाईची बाजू घेतली, पण हाथरस येथे झालेल्या घटने बद्दल काहीच बोलल्या नाही आणि आता दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देत आहेत, अशा प्रखर प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.