Skip to content Skip to footer

कणकवलीच्या बळावर दादागिरी खपवून घेणार नाही उदय सामंत यांचा राणेना खोचक टोला

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी कणकवलीच्या बळावर दादागिरी करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथील निवडणूक प्रचार सभेत दिला.

तालुक्यातील गोष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी बंडखोरी करून स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण तापले आहे.

या पार्श्वभूमीवर तेथे आयोजित प्रचार सभेत सामंत म्हणाले की, ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच मंगेश साळवी कणकवलीचे (माजी खासदार नीलेश राणे गट) समर्थन गोळपमध्ये घेऊन या निवडणुकीत दादागिरी करणार असतील तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही सुसंस्कारित आहोत, पण जशास तसे उत्तर देण्याची ताकद माझ्या तरुण कार्यकर्त्यांंमध्ये आहे. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. शिवसेनेमध्ये कोणताही नवा—जुना वाद नाही. राजकीय अस्तित्वासाठी भाजप हतबल झाल्यामुळे वाद उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. पण येथे शिवसेनाना तळागाळात रुजली आहे. साळवी यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. त्यांना  दोनवेळा चर्चेला बोलावून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यत शिवसेनेची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सोबतच गाव राहील, याची खात्री आहे. याआधी शिवसैनिक साळवींच्या मागे उभा राहिला. त्याच्यासाठी त्याग केला. तेच बंडखोरी करत असतील तर त्यांची मक्तेदारी नक्की मोडीत काढू, असाही इशारा सामंत यांनी दिला.

निवडणूक प्रचाराची सांगता

दरम्यान या निवडणुकीसाठी प्रचाराची बुधवारी सांगता झाली. येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यत शिवसेनेचे प्राबल्य असून त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण या पक्षाची ताकद मुख्यत्वे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेसनेही काही ठिकाणी सदस्य निवडून आणण्यासाठी प्रय केले आहेत. यावेळी भाजपा प्रथमच स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे प्रचारात रंगत आली होती. उमेदवार, गावातील पुढारी, पक्षांचे पदाधिकारी यांच्यामार्फत गावागावात कॉर्नर सभा, घरोघरी गाठी भेटी यासह प्रचार पत्रके वाटण्यावर भर देण्यात आला. तसेच शक्तीप्रदर्शन करत प्रचार फेऱ्याही काढण्यात आल्या. फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या समाजमाध्यमांचा वापर, हे या वेळच्या प्रचाराचे खास वेगळेपण होते.

शिवसेनेकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अ‍ॅडव्होकेट अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम इत्यादी नेतेमंडळी प्रचारात उतरली. राष्ट्रवादीची धुरा मुख्यत: चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि खेडचे माजी आमदार संजय कदम यांच्यावर होती. भाजपच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन इत्यादी नेते हिरीरीने प्रचारात उतरले. शेवटच्या दिवशीही सर्वच पक्षांकडून गाव बैठकांवर भर दिला होता.

Leave a comment

0.0/5