Skip to content Skip to footer

सोलापुरात भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी शिगेला, पक्षातील वाद चव्हाट्यावर

सोलापुरात भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी शिगेला, पक्षातील वाद चव्हाट्यावर

सोलापूर महानगर पालिकेचे भाजपा पक्षाचे माजी उपमहापौर राजेश काळे यांची मनपा अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र काळे यांच्यावर पक्षांतर्गत झालेली कारवाई अर्थात पक्षात सर्वकाही ठीक आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मुळात काळे यांच्यावर झालेली कारवाई ही सोलापूरच्या भाजपमधील वाढत्या बेशिस्तीचे, गोंधळाचे आणि उबग येईल अशा कमालीच्या गटबाजीचे शेवटचे टोक म्हणायला हवे.

मागच्या चार वर्षात महापालिकेत भाजपामध्ये भांडण, गटबाजीशिवाय दुसरे काहीही पाहावयास मिळाले नाही. माजी मंत्री विजय देशमुख व सुभाष देशमुख या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या गटबाजीने एवढे शेवटचे टोक गाठले होते की, एकदा दस्तुरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. आठ दिवसांत आपापसातील वाद न मिटवल्यास महानगर पालिकाच बरखास्त करण्याचा इशाराही फडणवीस यांना दोन्ही नेत्यांना द्यावा लागला होता मात्र या इशाऱ्यानंतर गटबाजी काही थांबलेली नव्हती.

या पार्श्वभूमीवर अलीकडे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेत आपले इतर सहकारी जसा बेरकीपणा दाखवितात, तसा बेरकीपणा दाखवायला गेले; परंतु त्यांच्या अंगलट आले. बेकायदा कामे करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव आणणे हे काही नवीन नाही. बेकायदा कामांसाठी थेट पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना शिवीगाळ करणे, इतर अधिकाऱ्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागणे आणि न दिल्यास दलित अत्याचारविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविणे अशा गंभीर आरोपांखाली राजेश काळे यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.

Leave a comment

0.0/5