Skip to content Skip to footer

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये – संजय राऊत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये – संजय राऊत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग प्रश्न सध्या चांगलाच तापू लागलेला आहे. त्यात कर्नाटकाच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे घराण्याचे आहेत यांची आठवण कर्नाटकी सरकारला करून दिली आहे.

कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईल, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. या विषयावर ज्या पद्धतीने पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरूवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळले तरी इकडे आम्हाला फरक पडत नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

तसेच, “मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इथे कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही.” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे.” असं देखील राऊत यांनी यावेळी बोलून दाखवले.

Leave a comment

0.0/5