Skip to content Skip to footer

छत्तीसगडमधील या गावात आहेत फक्त ४ मतदार

रायपूर–  छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये निवडणूक आयोगाने कोणतीही कसूर बाकी ठेवलेली नाही. मतदारांची संख्या एखाद्या मतदार संघात एक अंकी असली तरी प्रत्येक पात्र मतदाराला मतदान करता येणार आहे. मतदान करण्याची त्यांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाचे कर्मचारी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील मतदारांना मतदानाची संधी मिळवून देण्यासाठी बारकाईने तयारी केली आहे. या तयारीदरम्यान, भारतपूर-सोनहत मतदार संघात एक असे गाव समोर आले आहे, जेथे पात्र मतदारांची संख्या केवळ ४ आहे. मतदान केंद्र १४३ मधील मतदार संघात असलेल्या शेरानदांध नावाच्या या गावात केवळ ४ मतदार आहेत. यापैकी ३ एकाच कुटुंबातील आहेत.

याबाबत माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी एन. के. दुग्गा म्हणाले की, या ठिकाणी मतदान अधिका-यांचा गट तिथे एक दिवस अगोदर जाऊन तंबू उभा करेल. हेच मतदान केंद्र या ४ मतदारांसाठी असेल. शेरानदांध हे गाव जंगलात दुर्गम ठिकाणी आहे. तिथे पोहोचण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना खडकाळ पहाडी प्रदेशातून ५-६ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. मुख्य रस्त्यापासून हे गाव १५ किलोमीटरवर आहे.

२ टप्प्यांत छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दक्षिण भागातील १८ मतदार संघांमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होईल. तर २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. ११ डिसेंबरला दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी होईल.

Leave a comment

0.0/5