Skip to content Skip to footer

Lok Sabha 2019 : नितीन गडकरींविरोधात लढणार भाजपचेच माजी खासदार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी देण्याचे ठरविले असल्याचे समजते. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर काल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विचारविनिमय केला.

सोमवारी (ता. 11) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊन महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.

महाष्ट्रातील उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांची एकत्रित बैठक दिल्लीत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसशी अदलाबदल करण्याच्या आणि आघाडीतील लहान पक्षांना सोडावयाच्या जालना, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आदी जागांवर आजही निर्णय होऊ शकला नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एकच नाव पुढे आलेल्या 12 मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यात सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, धुळ्यातून रोहिदास पाटील, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा आदी चेहऱ्यांचा समावेश आहे. परंतु, नांदेडमधून विद्यमान खासदार व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव पाठविण्यात आले आहे. तर हिंगोलीतून खासदार राजीव सातव पुन्हा लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. मात्र, विद्यमान खासदारांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाचा असल्याचे कळते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमधील उमेदवारीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक समितीपुढे पाठविण्यात आला आहे.

याशिवाय आठ मतदारसंघांमध्ये दोन प्रबळ नावे पुढे आल्याने तेथील उमेदवार ठरविण्याचा चेंडू केंद्रीय निवडणूक समितीकडे ढकलण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने पुणे, मुंबईतील उत्तर-मध्य, संजय निरूपम यांचा आग्रह असलेल्या मुंबई उत्तर पश्‍चिम, मुंबई दक्षिण मध्य हे चारही, तसेच यवतमाळ-वाशिम आदी मतदारसंघ असल्याचे समजते. यामध्ये नागपूरमधून भाजपचे हेविवेट मंत्री नितीन गडकरींविरुद्ध लढण्यासाठी नाना पटोले यांना विचारण्यात आले. तर पटोले यांनीही यासाठी होकार दिल्यामुळे त्यांचे नाव नागपूरसाठी निश्‍चित झाल्याचे काँग्रेसमधूनच बोलले जात होते.

काँग्रेसच्या छाननी समितीमध्ये प्रदेश सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, तसेच प्रदेश सहप्रभारींचा समावेश असला तरी आज विखे-पाटील या बैठकीला येऊ शकले नाहीत. तर खर्गे आणि वेणुगोपाल यांनी उमेदवार निवडीतील गोंधळ कमी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बाजूला सारून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, नितीन राऊत, शिवाजीराव मोघे आदी नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.

प्रिया दत्त की नसीम खान? 
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त आणि नसीम खान यांच्यात चुरस आहे. तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकनाथ गायकवाड आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर इच्छुक आहेत. यवतमाळ-वाशिममधून आधी माणिकराव ठाकरे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु शिवाजीराव मोघे यांनी आव्हान दिल्यामुळे हा मतदारसंघदेखील नावनिश्‍चितीसाठी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5