Skip to content Skip to footer

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन तयार………..

लोकसभा निवडणुकीला भाजपाने राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांना आपआपल्या मतदार संघात अडकून ठेवले होते. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्या सारख्या नेत्यांना इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरता आले नाही. लोकसभा निवडणुकीत शरद पवार कुटूंबाला बारामती आणि मावळातून बाहेर पडू न देता भाजपने घायकुतीला आणले होते. तोच पॅटर्न वापरत बारामती, कागल, इस्लामपूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्वाचे मतदारसंघ टार्गेट केले जाणार आहेत. त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील हे बारामतीत पुन्हा एकदा तळ ठोकणार आहेत.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर हे जिल्हे भाजपला काबीज करावयाचे आहेत. नगरला लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यावरही भाजपचा डोळा असून तेथील राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करण्यात भाजपला पुरते यश प्राप्त झाले आहे. त्यासाठी ही व्युहरचना आखण्यात आली आहे. बारामती आणि कोल्हापूरला तसेच कागलसाठी तगड्या उमेदवारांची चाचपणी मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील करत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौर्‍याकडे पाहिले जात आहे.
कोल्हापूरला कागलमधून समरजीत घाडगे यांना रिंगणत उतरवता येते का याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात कांचन कुल यांनी राट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. त्यात चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा होता. त्या दरम्यानच विधानसभेत या मतदारसंघातील उमेदवार हेरण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्या जोरावरच चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांना विधानसभेचे खुले आव्हान दिले होते. सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला चाप लावण्यास भाजपने सुरूवात केली आहे. पवारांच्या हुकमी एक्क्यांना निवडणुकीत धुळ चारू असे भाजपच्या गोटातून ठामपणे सांगितले जात आहे.

बीडमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या नाडया आवळण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीची ही धडाडणारी तोफ भाजपकडून थंड करण्यात येणार आहे. म्हणूनच भाजपच्या या खेळीला शह देण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे नावाचा नवा पत्ता पवार बाहेर काढण्याच्या मार्गावर आहेत. शरद पवारांनीही कंबर कसत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत बर्‍याच नविन नावांचा समावेश केलेला आढळून येणार आहे.

Leave a comment

0.0/5