Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, “मातोश्री” निवासस्थानी स्वीकारणार शुभेच्छा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या (शनिवारी) वाढदिवस आहे. राज्यभरात तो उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या वाढदिवसाला होर्डिंग्ज, पुष्पगुच्छ नकोत तर समाजाच्या, शेतकर्‍यांच्या आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी उपक्रम राबवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठय़ा उत्साहाने साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी हजारो शिवसैनिकांची गर्दी होते. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत कलानगरचा परिसर शिवसैनिकांनी फुलून जातो. उद्धव ठाकरे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा स्वीकार करतात, राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांची आस्थेने विचारपूस करतात.

उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी ठिकठिकाणी फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात, मात्र होर्डिंग्ज, पुष्पगुच्छांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजाच्या कल्याणासाठी वापरा, सामाजिक उपक्रम राबवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून तसा प्रतिसादही मिळत असून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळ वाटप, विनामूल्य शालेय साहित्य वाटप आदी कार्यक्रम राबवले जात आहेत.

Leave a comment

0.0/5