Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे नेते अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी काल त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. आता मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास मालाड पश्चिम विधानसभेतून ते शिवसेनेचे उमेदवार असतील अशीदेखील जोरदार चर्चा आहे.

आमदार अस्लम शेख हे १९९९ ते २००४ समाजवादी पार्टी व २००४ ते २००९ या काळात काँगेसचे नगरसेवक होते. २००९, २०१४ मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पी उत्तर वॉर्डमध्ये काँग्रेसचे ४ नगरसेवक आहेत. त्यातील वॉर्ड क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद अवैध जातीच्या दाखल्यामुळे रद्द झाले आहे.

अस्लम शेख गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या नार्वे रोडवरील कार्यालयात फिरकलेच नसल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असून त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्याचे समजते. आमदार शेख यांचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Leave a comment

0.0/5