लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात उमेदवारी अर्ज दाखल करणे चालू झाले आहे. त्यातच मावळ मतदार संघातील राष्ट्रवादी उमेदवार तथा अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शेतीतून कोठ्यावधीचे उत्त्पन्न घेतल्याचे आपल्या शपथ पत्रात दाखविले होते. आता त्यांच्या जोडीला पार्थ यांनी सुद्धा शपथ पत्रात शेतातुन कोठ्यावधीचे उत्त्पन्न दाखविले आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडत असताना पवार परिवार कसे काय कोटीचे उत्पन्न शेतीच्या माध्यमातून घेत असतील असाच प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.
मावळ लाेकसभा निवडणुकीतून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पार्थकडे १६ काेटी ४२ लाख ८५ हजार रुपये किमतीची स्थावर, तर ३ काेटी ६९ लाख ५४ हजार रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. शेती आणि इतर व्यवसाय हे आपले प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याचे त्याने सांगितले आहे. बारामती तालुक्यात साेनगाव व ढेकळवाडी आणि मुळशी तालुक्यात घाेटावडे येथे त्यांच्या नावावर शेतजमीन असून स्थावर मालमत्तेत शेतीपेक्षा बिगर शेतजमीन असलेली मालमत्ता त्यांच्याकडे जास्त आहे, असेही त्यांनी नमूद केल्याचे शपथपत्रात दिसत आहे.
२०१४ मध्ये पार्थ यांनी मुंबईतून पदवी संपादन केली आहे. त्यांच्यावर काेणत्याही बँकेचे कर्ज नसले तरी आई आणि भाऊ यांना एकूण ९ काेटी ३६ लाख १३ हजार रुपयांचे देणे आहे. यापैकी ७ काेटी १३ लाख १३ हजार रुपये त्यांनी आई सुनेत्रा पवार यांच्याकडून, तर लहान भाऊ जयकडून २ काेटी २३ लाख रुपये घेतले आहे. एकूण बँक खात्यामध्ये ६५ लाख रुपयांच्या ठेवी असून २४ लाखांचे दागिने (३९१ ग्रॅम साेने व ३० किलाे चांदी) आहे. पार्थवर एकाही गुन्ह्याची नोंद नाही, असेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.