Skip to content Skip to footer

काँग्रेस भ्रष्टवादीच्या आघाडीला पापनाशक तलावात बुडवा – आदित्य ठाकरे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपले पाप लपवण्यासाठी देशद्रोहाचा कलम काढून टाकायची घोषणा केली आहे. अशा प्रकारे अतिरेकी प्रवृत्तीना समर्थन करणाऱ्या काँग्रेस भ्रष्टवादी आघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि त्यांचे हे पाप श्रीक्षेत्र माहूरगडच्या पापनाशक तलावात बुडवा, असे आवाहन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे रेणूका देवीचे दर्शन करुन त्यांनी आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांना संबोधित केले. प्रचंड उन, उष्णतेचा कहर झाला असतानाही या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यात आपापसात भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते करत आहे. सिंचनाच्या नावानेही महात्राष्ट्राला देशोधडीला लावण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. गेली अनेक वर्षे सत्ता त्यांच्या हातात होती, मात्र बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर आदींसाठी कुठलेही ठोस काम केले नाही. मराठवाड्यातील दुष्काळ भीषण होत चालला आहे. या सबंध मराठवाड्यात मी फिरलो, त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. सिंचनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी येवूनही काँग्रेसच्या काळात ती कामे पूर्ण झाली नाहीत. काँग्रेस व भ्रष्टवादी सरकारने केवळ आपल्या तिजोऱ्या भरल्या असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला होता.

दुष्काळाची पाहणी करताना शेतकऱ्यांचे दुःख आम्ही जाणून घेतले. प्रसंगी त्यांना पशुखाद्य दिले. त्याकाळात काँग्रेसचा एकही नेता व कार्यकर्ता शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी फिरला का? लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यात मी फिरलो. त्यावेळी दुष्काळाच्या व्यथा शेतकऱ्यांनी मला सांगितल्या. यामुळे जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. हे काँग्रेस भ्रष्टवादी सरकार आता उलथवून टाकण्यासाठी आणि देशात पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हिंगोलीचा खासदार देखील शिवसेना-भाजपा युतीचाच असला पाहिजे. सिंचनाच्या नावाखाली प्रचंड घोटाळे करुन आपली खिसे भरणाऱ्या या सर्व पापी मंडळींना श्रीक्षेत्र माहूरच्या पापनाशक तलावात बुडवून हिंगोलीत पुन्हा भगव्याचे तेज निर्माण करा आणि शिवसेना,भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a comment

0.0/5