काँग्रेसने निवडणूक प्रचारात नाव आणि फोटो वापरण्यावर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित भाजपच्या बैठकीला ते व्यासपीठावर दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे. विखे पाटील यांनी अद्याप काँग्रेस पक्ष किंवा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १२ एप्रिल रोजी नगरमध्ये भाजपची प्रचार सभा आयोजित केली आहे.
या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या निमित्ताने राधाकृष्ण विखे-पाटील हे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद तसेच काँग्रेस पक्षातील पदांवर असताना देखील भाजपाच्या प्रचार बैठकीत हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील हे भाजपात जाणार नाही असे सुद्धा बोलून दाखविले होते. परंतु ते आता भाजपा बैठकीला दिसून आल्यामुळे ते लवकरच भाजपा पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात आहे.
नगर मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादींने संग्राम जगताप यांना तिकीट दिलेली आहे. परंतु ही खरी लढत विखे आणि जगताप यांच्यात नसून पवार आणि विखे पाटील या दोन्ही परिवारात आहे असेच नगर मध्ये बोलले जात आहे आणि दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.