Skip to content Skip to footer

भाजपाच्या धक्क्यानंतर ममतांच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल

तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक काल भाजपात सामील झाल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी  यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये फेरबदल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला परिणाम लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला उत्तर बंगाल आणि जंगलमहल परिसरात यश मिळवता आले नाही. यातच, या भागातून निवडून येणारे विनोय कृष्णा वर्मन आणि शांतिराम महतो यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तर सुब्रता मुखर्जी, शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी आणि ब्रात्या बसू यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,’पश्चिम बंगालमध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होतील. सध्याचे सरकार 2021 पर्यंत टिकणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडीच्या दबावाखाली चालत आहे.’

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ममता बनर्जी यांच्या जवळचे नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. तर, कालच तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांच्यासह 50 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सीपीएमचे आमदार विधायर देवेंद्र रॉय सुद्धा भाजपात सामील झाले आहेत.

Leave a comment

0.0/5