Skip to content Skip to footer

ट्विट भोवलं; ‘गांधीजींना नोटांवरून हटवा’ म्हणणाऱ्या निधी चौधरींची बदली

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महिला IAS अधिकारी निधी चौधरी यांचीमहापालिकेतून मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. निधी चौधरी यांनी 17 मे रोजी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली केली आहे. तसेच, निधी चौधरींना ट्विट प्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

दरम्यान, महात्मा गांधींचे नोटांवरुन फोटो काढून टाका, जगभरातील त्यांचे पुतळे हटवा, असे ट्विट निधी चौधरी यांनी केले होते. या वादग्रस्त ट्विटमुळे निधी चौधरी यांच्यावर टीकेची झोड उटली. यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरींना निलंबित करण्याची मागणी केली होती.

निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या असून सध्या मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) पदावर कार्यरत होत्या. याआधी त्या उपजिल्हाधिकारी होत्या. दरम्यान, निधी चौधरी यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधीच्या पुतळ्यासोबतचे फोटो ट्विटरवर अपलोड करत माझ्या ट्विटचा विपर्यास केला असल्याचे म्हटले होते.

यामध्ये ’17 मे रोजी करण्यात आलेले ट्विट मी डिलीट केले आहे. कारण काही लोकांचा गैरसमज झाला आहे. 2011 पासून जर या लोकांनी मला फॉलो केले असते तर मी गांधीजींचा अनादर करण्याचा विचारही करू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले असते. मी श्रद्धापूर्वक गांधीजींचा आदर करत असून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा आदर करत राहीन,’ असे निधी चौधरी यांनी म्हटले होते.

निधी चौधरींचे आधीचे ट्विट…
“महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.”

tweet-1_060119061447.jpg

Leave a comment

0.0/5