महाराष्ट्र बुलेटिन : कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या दरम्यान सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. मृत्यूच्या संख्येतही कमालीची घट होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेऊ शकतात असे सूत्रांकडून समोर येत आहे. त्याच वेळी, तज्ञ आता निर्बंधांमध्ये थोडीफार शिथिलता दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करीत आहेत.
असे म्हटले जात आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी आहेत आणि जास्त लसीकरण झाले आहेत तेथे लोकांना निर्बंधांमधून थोडी विश्रांती मिळू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधात शुक्रवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत (एसडीएमए) एक महत्त्वपूर्ण बैठक देखील घेतली आहे. या बैठकीत राज्य सरकारचे उच्च अधिकारी आणि राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य देखील सहभागी झाले होते.
तथापि कोरोना निर्बंध कमी करण्याबाबत या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नसला तरी कोविड टास्क फोर्सशी झालेल्या बैठकीनंतर आपण यावर निर्णय घेऊ शकतो असे सीएम ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दुसरीकडे, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, शासनाकडून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होऊ शकतात. ज्या जिल्ह्यांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट दोन आठवड्यांमध्ये ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा जास्त असेल अशा ठिकाणी या सवलती दिल्या जाऊ शकतात.
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही त्या देशांतर्गत उड्डाणे करणाऱ्या प्रवाशांना कोरोना टेस्टमधून सूट देण्याच्या विचारात आहोत, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यासह दुकाने आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांना देखील सवलत देण्याचा विचार करीत आहोत. तथापि, कोविड टास्क फोर्सचे सदस्य अद्यापही सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याच्या विरोधात आहेत.’
महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, रायगड, पालघर, कोल्हापूर आणि ग्रामीण पुणे येथे टीपीआर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत या जिल्ह्यांतील प्रशासनासाठी परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापुरात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. परंतु तरीही येथे टीपीआर खूप जास्त आहे.